अखेर मराठीत महाकवी निर्माण झाला
मराठीत महाकाव्य जन्म आले
-डॉ. प्रल्हाद वडेर
अलीकडे महाकाव्ये का निर्माण होत नाहीत? असा एक लेख फार वर्षांपूर्वी (कै.) वामन मल्हार जोशी यांनी लिहिला होता. तसाच प्रश्न लोक. कवी मनमोहन यांनीही ‘महाकवी जन्माला येण्या मराठीचे गर्भाशय कोते ?' असे विचारले होते. त्यांचे 'युगायुगाचे सहप्रवासी' हे खंडकाव्य वाचल्यावर त्यांच्यात ती ताकद होती यात शंका वाटत नाही. मराठीत महाकाव्य अद्याप निर्माण झालेले नाही. महाकाव्य न लिहिणारे महाकवी म्हणून स्वा. सावरकरांचा गौरव केला जातो पण त्यांनीही ते लिहिले नाही. 'छत्रपती शिवराय' नावाची महाकाव्ये काहींनी लिहिली. पण त्यांना महाकाव्ये म्हणणे कठीण आहे. 'महाकाव्य किंवा महाकादंबरी लिहिण्यासाठी जाज्वल्य मनोवृत्तीची आवश्यकता असते.' असा इतिहासकार राजवाडे यांचा अभिप्राय आहे. मराठीत गूढ काव्ये आहेत. त्यात बी, क्रांतीबुधे ही कवी मंडळी आठवतात. पण आतापर्यंत खरे महाकाव्य मात्र नव्हतेच.
पण आता विदर्भातल्याच सुधाकर गायधनी यांनी खऱ्या अर्थाने महाकाव्य लिहिले आहे. त्याचे नाव आहे 'महाकाव्य अर्थात समग्र देवदूत' त्यावर पुण्यात चर्चाही झाली. हे काव्य डेमी रॉयल आकाराच्या तब्बल ५५५ पृष्ठे म्हणजे जवळजवळ ११ हजार ओळींचे आहे. यावरून त्याची व्याप्ती व विस्तार लक्षात यावा. मात्र मराठी समीक्षकांनी त्याची उपेक्षा केली आहे!
इंग्रजीत व आपल्याकडे 'महाभारत', 'रामायण'सारख्या महाकाव्यरचना आहेत. पण तिथेही खऱ्या अर्थाने गेल्या तीनशे वर्षात जेमतेम अर्धा डझन 'महाकाव्ये' निर्माण झाली असल्याचा पाश्चात्य टीकाकारांचा अभिप्राय आहे. होमरच्या 'इलियड', 'ओडीसी' वगैरे पौराणिक महाकाव्यानंतर आधुनिक काळात मिल्टनचे 'पॅराडाइज लॉस्ट', बेवॉल्फ', अनियेड', पोर्तुगीज कवी कामायुशचे 'ल्यूडियड्स', 'डान्टेचे 'डिव्हाईन कॉमेडी' वगैरे लोकप्रिय आधुनिक महाकाव्यांची एक परंपरा आहे. आपल्याकडे लंकाधिपती रावणाला नायक करून लिहिलेले मधुसूदन दत्ताचे 'मेघनाद वध' हेही आधुनिक महाकाव्य समजले जाते. संस्कृतमध्ये महाकाव्याची परंपरा आहे आणि त्यांचे एक समीक्षाशास्त्रही आहे. त्यात महाकाव्यात काय • असावे याचे दंडक व रचनेची घट्ट चौकट आहे. शोकात्मिकेच्या खालोखाल ॲरिस्टॉटलने महाकाव्याचा क्रम लावला आहे प्रदीर्घता, चिंतनशील, कृतिगांभीर्य, अलंकारिक व उच्च दर्जाची भाषा व शैली. सर्गात्मक रचना, कथानक, धीरोदात्त नायक, सैन्य, युद्धे, पराक्रम व प्रेमकथा अशी काही महाकाव्याची लक्षणे संस्कृत व पाश्चात्य समीक्षेत मानली जातात. दैवी किंवा मानवी नायकांच्या पराक्रमावर किंवा कृतीवर एखादी जमात व राष्ट्र यांचे भवितव्य अवलंबून असते आणि शेवट गोड असतो. महाभारत अर्थातच त्याला अपवाद आहे. त्यात शेवटी यादव व कुरूकुळाचा विनाश आहे.
सुधाकर गायधनी यांचे 'कब्रीतला समाधिस्त' हे काव्य गाजले. आता महाकाव्य (समग्र देवदूत) मध्ये पाच सर्गातून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे महाकाव्य लिहिले आहे. ते टागोरांच्या गीतांजलीला जवळचे आहे. त्याला रूढ अर्थाने कथानक नाही. त्यात शूर नायक, त्याचे पराक्रम वा त्याची प्रेमकथा नाही. त्यात हिरो नसून अँटिहिरो आहे. या महाकाव्याचा विषय एक जमात, राष्ट्र नसून सबंध मानवजात आहे. त्याची शैलीही संस्कृत, भरजरी नसून बोलीभाषेला जवळची अशी आहे. ती उपरोध, विनोद, उपहासांनी युक्त अशी आहे. परंपरागत महाकाव्याची चौकट त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला आहे. अरुण कोलटकरांनी त्यांच्या 'भिजकी वही'मध्ये सबंध मानवजातीतील स्त्रियांच्या अश्रूंचा शोध घेतला. गायधनी यांनीही समग्र मानवजातीची व्यथा आपल्या कवेत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांचा चित्रफलक विशाल आहे.
"रामायण'प्रमाणेच एका पक्ष्याच्या विषारी बाणाने पायाळ हो या महाकाव्याची सुरुवात होते. वातील देवदूत हा पुराणातील दोन हनी पंखांच्या कवेत घेऊन उडणाऱ्या गंडभिरूड या पक्ष्याप्रमाणेच एक महापक्षी आहे. पेट अनंतात झेप घेत असताना मर्त्यलोकीच्या पारध्याच्या पोराने ढगाला जखमी करण्याच्या गमतीतून सोडलेल्या विषारी बाणाने त्याच्या काळजाचाच वेध घेतला आणि तो प्रचंड घनगर्जना करीत एक निर्जन समुद्र बेटावर कोसळला. आपला हा प्राचीन पूर्वज घायाळ होऊन पडलेला पाहाताच आकाशातील विविध पाखरांचे थवे त्याला कण्हत कुंथत मरू देण्यापेक्षा चोचीने टोचून टोचून त्वरित मारून टाकून यातनांतून सोडविण्याचा निर्णय घेतात. ते त्याच्यावर तुटून पडणार तोच तो शांतपणे पडून असलेला देवदूत त्यांच्याशी जो चिंतन-संवाद करतो ते म्हणजे हे 'समग्र देवदूत' महाकाव्य ब्रह्मांडाच्या अंतरंगात प्रवेशून पुनश्च धरतीवर यायला तो पक्ष्यांना आवाहन करतो आणि एक अवधूत पक्षी ते धाडस करायला तयार होतो. त्या दोघांचा प्रवास हा मानवजातीचा प्रवास आहे. सहावा स्वर्ग पार करताच ईश्वर संकल्पनेशी त्यांची भेट होते. त्यांचा वादसंवाद होतो. सातव्या स्वर्गात त्यांना निर्मिती आणि विनाश, विज्ञान आणि निर्मितीच्या रहस्याचे परमशांत असे सूत्र अवकाश नीलांबराच्या ठिकाणी गवसते आणि तत्क्षणी त्यांचे आत्मभान ब्रह्मभानाशी झंकारते. त्यांना निर्मिकाची विश्वसंवेदना प्राप्त होते. सजीव-निर्जीवमधील त्यांचे द्वैत नष्ट होते. खऱ्या अर्थाने त्यांना आत्मभान होते. ते मुक्त होतात. त्यांच्या जीवनाचे सार्थक होते.
मानवजातीचा शतकानुशतकाचा प्रवास फार खडतर आहे. त्याच्या भ्रष्टतेमुळे सगळ्या समाजव्यवस्था सडलेल्या आहेत. आज 'मेरा देश महान 'पेक्षा 'माझा देश लहान' हे अनेक अर्थानी खरे आहे. इतिहास, संस्कृती, नीती यांना अनेक भागात तडे गेले असून सगळेच अनिश्चितततेच्या भोवऱ्यात त्रिशंकू अवस्थेत लोकत आहेत. सगळ्यांवरचा विश्वास उडाला आहे. एक भयानक वास्तव समोर उभे आहे. विनाश! मानवी जीवनाचं रहस्य अज्ञात आहे. वय, नातेसंबंध चांगले- वाईट यांतील भेद कुणीच ओळखत नाही. या विश्वाचा माणसाने अगदी नरक केला आहे. स्वतःच्या आईला सुद्धा मारून खायला तो उद्युक्त झाला आहे. आता त्याला उःशापाची तळमळ लागली आहे.
या महाकाव्याच्या पहिल्या सर्गात 'बदचलन नगरीचे बेअदब किस्से ' आहेत.
उत्क्रांतीच्या डोक्यात उवा
नि लहानमोठे खेळतात जुव्वा!
दोन वेळच्या भुकेल्या माणसाला
सांगितले जाते की
किलोच्या भावाने देहाला विक
आणि खाटकापासून धंदा शिक.
माणसाला इथं माणूस म्हणून, माणसासारखं जगात येत नाही. दुसऱ्या सर्गात खुद्द विधात्याला मानव नावाचा प्राणी निर्माण करून पश्चाताप झालेला आहे. सारे गंगापुत्र झाले आहेत गंगेला बेईमान . ज्ञानेश्वराच्या वेद रेड्यालाही गेल्या सातशे वर्षात माणूसच काय, एक रेडाही बदललेला दिसत नाही.. उलट शेण खाणाऱ्यांचेच होतात इथं सत्कार. हे सगळं पाहात तो महापक्षी व अवत पक्षी यांचा प्रवास एका ब्रह्मांडापासून दुसऱ्या ब्रह्मांडाकडे चालू राहतो.
'मिले सूर तुम्हारा हमारा' हे सूर फार सुंदर आहेत. पण त्यासाठी कृतियुद्ध संपली पाहिजे. 'जात' नावाच्या संसर्गजन्य रोगापासून स्वतःला आतातरी जपले पाहिजे. आज परमेश्वरालाही धर्मसंस्थापनार्थ पृथ्वीवर अवतार घेणे परवडत नाही. कारण संतांच्या नव्हे तर जंताच्या जातीतली अलीकडेची स्वतःच स्वतःला संत म्हणवून घेणारी पिलावळ त्याला आवडत नाही. आपण मानव निर्माण केला याचा त्याला पश्चाताप झाला आहे.
शेवटच्या सर्गातील परमेश्वर आणि यात्रेकरू यांच्यामधील संवाद विलक्षण अर्थपूर्ण आहे. आपल्या अस्तित्वाबद्दलचा संशय घेणाऱ्यांना परमेश्वर म्हणतो की मला नाकारू नका, नष्ट करू नका. मी सुष्टांची संकल्पना आहे तिला कर्मकांडात सडवू नका इथे काहीच अमर नाही. हे जनुक विश्वही अमर नाही. तेही मर्त्यच. पण ते गंगायमुनाप्रमाणे प्रदीर्घकाळ शुक्रक्रासंगे कालक्षेप करू शकतात. त्यातूनच प्रतिभावंत जन्माला येतात. हे शास्त्रीय सूत्रही या 'महाकाव्या'त आहे. परमेश्वराला उद्देशून यात्रिकांनी मागितलेले पसायदान करून देते.
टळो आत्मगुंता/मोह मायाजाळ
कळो अंतराळ/अंत: झरा
जाणीव नेणीव/विश्वसंवेदना
पाषाणवेदना/कळो आम्हा
हत्ती आणि मुंगी/सारख्या चेतना
वृक्षांच्या यातना/होवो आम्हा
तोडता ते पान/जणू वाटे कान
जैसे संज्ञाभान/लाभो आम्हा
यात्रिकांना असे आत्मभान 'जन्म आणि मृत्यू/शेंगेतले दाणे/पुन:पुन्हा येणे/बीजातून' ही जाणीव होते. पूर्वजन्म म्हणजे पूर्वसंचित स्मृतींचे ज्ञान, पुनर्जन्म म्हणजे शुक्र जनुकरूपाने पुनःपुन्हा जन्म घेणे. काही महानुभावांनी हजारो लाखो वर्षापूर्वीचे गतजन्मज्ञान (जिवंत) जनुक - जागृतीमुळे प्राप्त होते. एखादी निरक्षर बहिणाबाई मग अक्षरयात्रेची थोर कवयित्री ठरते. असे हे मानवजातीचे निर्मितीचे सूत्र 'महाकाव्यात' आहे.
या काव्याची भाषा बोलीतील, व्यवहारातील आहे. तिला अनेक वलये, आवर्तने आहेत. अभंग, ओवी अशा परंपरागत छंद, वृत्तांचा ती वापर करते. कधी ती लोकवाणीजवळ जाते व तुकारामाची आठवण करून देते. अनेक वाक्यखंड म्हणीसारखं येतात. भेदक उपरोध, उपहास ती करते. उदाहरणार्थ
आम्ही चिंध्या पांघरून,
सोनं विकायला बसलो
गिन्हाईक कसं ते फिरकेना,
मग सोनं पांघरून
चिंध्या विकत बसलो,
गर्दी पेलवता पेलवेना
या ओळींना कै. यशवंतराव चव्हाणांनी म्हटल्याप्रमाणे लोकजीवनाच्या युगायुगाच्या शहाणपणाचे सार आहे -
आणखीही काही ओळी लक्षात राहतात
१) माणूसच माणसावर जुलूम करतो. माणूसच माणसाला मलम लावतो.
२) संत म्हणतात कीर्तिरूपे पुजणारे सर्वत्र असल्यामुळे, कीर्तीसाठी तरी कशाला झुरावे ?
३) मुद्दाम कुणावर चाल करून जाऊ नये कुणी चाल करून आले. त्याला पाठ दावू नये आणि शिंप्याकडून युद्धगणवेश मिळेस्तोवर योद्धाने वाट पाहू नये.
४) पण जे नाला ओलांडून नदीत येतात. प्रवाहाचे पाणी होतात आणि धो धो वाहतात त्यांचाच दर्या होतो. जे नाल्याचा तलाव बांधतात आणि काठाकाठावर भांडतात त्यांचा अखेर त्याच पाण्यात तोल जातो.
५) खरं तर माणसं, जगतात कमी, झुरतातच जास्त.
६) मी येथे पाप पुण्याच्या बाजारातून एकटाच भटकलो खूपदा आणि पापाचे नाणे चालवून पुण्य खरेदी केले अनेकदा.
अशा या गायधनींच्या प्रकल्पात चिंतनशीलता, वैचारिकता काठोकाठ भरून राहिली आहे. 'महाकाव्य-समग्र देवदूत'च्या रूपाने मराठीत पहिल्यांदाच खरे महाकाव्य निर्माण झाले आहे.




महा वा क्य असं हवं ना - मुखपृष्ठावर तसं दिसतंय. महाकाव्य असं शीर्षक नाहीय बहुतेक. पण ते अलाहिदा- लेख आवडला.
उत्तर द्याहटवा'महावाक्य' हे महाकाव्य आहे; असे प्रल्हाद वडेर यांचे मत आहे.
उत्तर द्याहटवा