शेवटचे गीत

 शेवटचे गीत

लेखकः किऊ बिच हाऊ, व्हिएतनाम .



          

               (   किऊ बिच हाऊ, व्हिएतनाम . या हनोई येथे राहतात . व्हिएतनाम लेखक संघाच्या त्या सचिव असून उत्कृष्ट कवी आणि लेखिका आहेत. साहित्याक्षरच्या वतीने लवकरच त्यांचा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची ही कथा प्रस्तुत करीत आहे - प्रकाशक )

त्या व्हीआयपी टेबल ने त्या आलिशान बारमध्ये एक सर्वोच्च स्थान मिळवलेले होते . ते टेबल एका अतिशय आलिशान अशा हॉटेलमध्ये होते ज्यावर बसण्यासाठी  खूप दिवस अगोदर आरक्षण करावे लागत असे , तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यावर बसायला मिळेल याची शाश्वती नसे.

त्या अतिशय महागड्या आणि अलिशान  हॉटेलमधून बाहेर पडताना जेव्हा तुम्हाला कोणी पाहिल तेव्हा नक्कीच तुमचं सामाजिक स्थान एका उंचीवर जाऊन पोहोचलेलं असेल इतक्या उच्चभ्रू समाजातल्या लोकांसाठी ते हॉटेल होतं ! त्या हॉटेलमध्ये फक्त जाझ संगीत वाजवले जायचे आणि तेही बुधवार शुक्रवार आणि रविवार संध्याकाळीच . त्या काळातला अतिशय प्रसिद्ध बँड मुन वेव जॅझ ने त्या मंचावर राज्य केलेले होते आणि त्यामुळे हे हॉटेल आणि हा बँड सर्वांच्याच चर्चेचा विषय होता .

 

जेव्हा अधिकाधिक परदेशी लोक त्यांच्या नवीन ट्रेंड आणि पाश्चात्य जीवनशैली सह या शहरात येऊन गर्दी करत होते - तेव्हा सर्वत्र उंचच उंच इमारतींची संख्याही वाढत गेली , आणि शहरातील पुरातन वैभव ,  सर्व प्राचीन अवशेष  आणि  परिसरही नष्ट व्हायला वेळ लागला नाही. त्यांच्या सुसंस्कारीत आणि आधुनिक जिवनशैली सह त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचं स्वतःचं आणि त्या काळात अतिशय फॅशनमध्ये असणार मनोरंजनाचं साधन म्हणून जॅझ संगीतही सोबतच आणलेलं होतं .

 

बाख डॅन ही सुंदर स्त्री आसनावर बसण्यापूर्वी तिने तिच्या महागड्या आणि सुंदर फुलांचं डिझाईन असणाऱ्या मलमलच्या खूप घेरदार स्कर्टची टोकं धरून ती जमिनीवर पडणार नाहीत अशा पद्धतीने आणि नजाकतीने उचलून ठेवली आणि मुळातच तिचे लांब पाय आणि पायातल्या स्टायलिश उंच सॅंडलमुळे ती अगदी सहजासहजी त्या व्हीआयपी टेबलवर आरामात बसली. टेबलाच्या मध्यभागी सुंदर आणि नाजूक हस्ताक्षरात कोरलेला एक छोटासा पांढरा कागद ठेवलेला होता त्यावर स्पष्टपणे दिसेल अशा अक्षरात  - ' आदरणीय श्री ह्यू '  असे लिहलेले होते . तिच्या शेजारी बसलेल्या माणसाची उच्च सामाजिक श्रेणी आणि श्रीमंती  दर्शवणे हा त्यामागचा हेतू असावा . या आलिशान आणि आरामदायक हॉटेलमध्ये तिने पहिल्यांदाच प्रवेश केलेला होता ते फक्त त्याच्या जवळ जाण्यासाठीच ! तिला तिच्या सौंदर्यावर खूप गर्वही होता आणि ह्यु ने सुद्धा या गोऱ्या आणि सुंदर स्त्रीला पहिल्याच भेटीत प्रभावित करण्यासाठी हे आलिशान आणि महागडे ठिकाण निवडले होते .

 

तिच्या ग्लास मधली रेड वाइन मानिकरत्ना सारखी चमकत होती , संपूर्ण हॉल सुंगधित अत्तराने सुवासित झाला होता . सर्वत्र उजळलेले लाल दिवे फक्त जॅझ संगीतकारांच्या सेवेत उजळत असल्याचे भासत होते . खरंतर तिला अशा प्रकारच्या संगीताची माहिती नसली तरी ती त्याच्या एका वेगळ्याच  तालाने , त्याच्या उत्स्फूर्त शैलीने आणि एकूणच तिथल्या वातावरणाने अगदी मोहीत झाली होती .

' तुलाही लवकरच जॅझची आवड निर्माण होईल ' , ह्यु ने जॅझच्या मंद सुरात सूर मिसळत अगदी हळू आवाजात तिला सांगितले . त्याच्या मते अशा प्रकारच्या संगीतात अशा माणसांना रुची असते  ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिलेले आहेत .

 वयाच्या अकराव्या वर्षी तो आपल्या सावत्र आईच्या वाईट वागणुकीला कंटाळून घरातून पळून आलेला होता . त्याला जिवंत राहण्यासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शक्य ते सगळं काम करावं लागलं होतं - अगदी बूट पॉलिश करणे , वर्तमानपत्र विकणे , इतरांचे कपडे धुणे आणि अगदी जमेल ते ! त्याच्या या कामामुळे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून आणि त्याने केलेल्या वर्षानुवर्षाच्या काटकसरीतून 1981 मध्ये त्याला एक होंडा मोटरसायकल चे  जुने मॉडेल विकत घेण्यात यश आले होते आणि परिणामी तो मोटरसायकल टॅक्सी चालक बनला होता .

 

दरम्यान मोकळ्या वेळेत त्याने व्यापार विषयाची पुस्तके वाचली होती आणि त्याचबरोबर रात्र महाविद्यालयात जाऊन व्यवसाय प्रशासनाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता . काही वर्षानंतर ह्यू नी स्वतःची एक बेकरी उघडली त्यानंतर काही दिवसांनी त्याने सुरु केलेला त्याचा  डिटर्जंट कंपनीचा व्यवसाय खुप नावारूपाला आला . त्या व्यवसायाने त्याला खुप नाव मिळवून दिले होते.

 

हयू अगदी एकटक त्या मुलीकडे पाहत होता आणि त्याला असे वाटत होते की , ती लवकरच त्याची होईल . कारण खरंच आज बाख डॅन डेली च्या फुलांसारखी मोहक दिसत होती आणि तिच्यावरून हयू ची नजर जराही हटायला तयार नव्हती .तीही सॅक्सोफोन मधून निघणाऱ्या  जॅझ च्या संगीताने मंत्रमुग्ध झालेली होती . तो सॅक्सोफोन वाजवणारा गोल चष्म्याचा मुलगा जणू काही त्या सॅक्सोफोन मधून मलमली रिबन सारखे धुंद हवेत तरंगणारे सूर आळवत होता . त्याच्या संगीताने तिला तो स्वर्गीय आनंद देत होता . तीही त्या सुरांच्या तालात मंत्रमुग्ध होऊन  आपले शरीर डोलवत होती आणि हळूच स्वतःचे डोळे थोडेसे किलबिले करून ईकडे तिकडे पाहत असतानाच अचानक तिचे लक्ष शेजारी बसलेल्या तरुणाकडे गेले जो तिच्यासारखाच स्वप्न पाहत असल्याचे तिला जाणवले .

'तुला त्याच्यामध्ये खूप रस आहे , हो ना ' , हयू ने त्या सॅक्सोफोन वाजवणाऱ्या त्या मुलाकडे बोट दाखवत तिला विचारले .

' तो आवडत  नाही असे म्हणणे मुर्खपणाचेच ठरेल ', तीने अनिच्छेनेच उत्तर दिले .

" तो बान ले फी , - एक जॅझ संगीतकार आहे ,त्याच्या प्रांतातला अतिशय  सुप्रसिद्ध संगितकार . " तो अतिशय हळू आवाजात बोलत होता. तो खरोखरीच पुरातन वादी  जीवनशैलीत जगणारा तरुण संगीतकार आहे . परंतू त्याच्या जीवनशैली मुळे जरी तो थोडासा विचित्र वाटत असला तरी तो अत्यंत उदार मनाचा आणि प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करून घेणारा अवलिया आहे . लोक कदाचित त्याच्यावर प्रेम करत असतील अथवा त्याला घाबरत असतील तरिही त्याचं जॅझ संगीत वाजवणं अतिशय उत्कृष्ट असं आहे . " असे म्हणत हयू ने  बान ले फी चे वाढलेले दिर्घ वर्णन थांबवले .

 

हयू ने त्या अनोळखी संगीतकाराचे अगदी तंतोतंत आणि खरखुरं वर्णन केलेले होतं . कारण याच संगीतकाराचे असे बरेच किस्से डॅनने इतरांकडूनही ऐकलेलेच होते . तिला हे ही माहित होते की तो अत्यंत देखणा आणि अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे.

" ' फक्त पाच सेकंद त्याच्याकडे पहा  , आणि  तूम्ही लगेच त्याच्या प्रेमात पडाल ' - हयू म्हणाला .

लोकांच्या मते तो जॅझ संगीतकार होण्यासाठीच मुळी जन्माला आलाय . अगदी त्याच्या पहिल्याच गाण्याने लोकांवर जादू केली होती आणि प्रत्येकजण तो आणि त्याचे गाणे याच विषयावर बोलत होते. खरतर - अशा अफवाही पसलेल्या होत्या की त्याचे संगीत खुप आर्त होते , दुःखाने व्याकूळ करून टाकणारे होते आणि तीन तरुण मुलींनी त्याची गाणी ऐकून हताशपणे आत्महत्या केली होती ."

बाख ला अजूनही त्या गाण्यांचा काही भाग अगदी स्पष्टपणे आठवतो -

" तू माझा तो निळा चंद्र माझ्यापासून हिरावून घेतलास

अन्

जणू

माझ्या श्वासातला प्राणवायूच संपला !

तू माझ्या आत्म्याचा  काही भाग चोरलास आणि मला तुझा गुलाम बनवलस -

त्याचे तुकडे तुकडे करून .

आता एकही पान दिसत नाही हिरवाईने बहरलेलं -

पृथ्वी सुद्धा बेचिराख झाली आहे .

मला माहितीय -

मला आधिच माहित होतं -

खुप पूर्वीच माझं ऋदय पूर्ण पणे रितं झालेलं आहे . "

 

"बान ली फी ने हे गाणं तेंव्हा लिहलं होतं जेंव्हा त्याची पहिली प्रेयसी त्याला सोडून त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. हयू पुढे म्हणाला ती खरच अद्भूत स्त्री म्हणावी लागेल जिने त्याला अतिव  दुःख दिले आणि त्यामुळेच तो जॅझ चा  इतका अद्भूत संगीतकार बनला . कालांतराने त्याने स्वतःचा संगीताचा चमू तयार केला आणि त्याला नाव दिले मून वेव बँड . अल्पावधीतच त्याच्या बँड ने खुप यश कमावले आणि प्रतिथयश मिळवणारा एकमेव बँड बनला . पण त्यानंतर मात्र तो कधीच कुठल्याही स्त्री च्या प्रेमात पडला नाही मग ती कितीही सुंदर असो अथवा तरुण ! इतकेच नव्हे तर त्याने आजपर्यंत सुमारे 19 मुलींना स्पष्ट शब्दात नाकारून स्वतःपासून दूर केले आहे . आणि म्हणून माझ्या मते तुम्हालाही त्याच्याशी काही देणेघेणे नसेलच ! "

 

तीने अलगद त्याच्या खांदयावर डोके ठेवले आणि त्याने दिलेला -' जर तुम्हाला जॅझ संगीताचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे डोळे आणि मनही घट्ट मिटून घ्या आणि फक्त तुमचे ऋदय त्या संगीत लाटांवर लहरत राहू द्या ' हा सल्ला आठवला.

आता तीचे डोळे एकटक त्याला बघत होते जो डोळे मिटून स्टेजवर उभा होता आणि जणू त्याचे मिटलेले डोळेच त्याचे संगीत वाजवत होते .

 

बाख डॅन ही एक सुंदर पण स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणारी तरुणी होती . तीचे शारिरिक सौंदर्य अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्यवतींना हेवा वाटावा असे  होते. आजच्या संध्याकाळी ती रस्त्यालगतच्या एका कॉफी स्टॉलमधे जिथे खुप वेगवेगळ्या कलरच्या ऑरकिडस सुंदर अशा कुंड्यामधून  छताला लटकवलेली होती . आणि अशा सुंदर मोकळ्या हवेतल्या या कॉफी स्टॉलमधे ती त्या जॅझ संगितकाराची  वाट पाहत होती .

' शुभ संध्याकाळ ले फी ' ,  ती त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली.

' शुभ संध्याकाळ बाई , मला तुम्ही इतक्या आकर्षक वाटत नाहीत ' , तो उत्तरला .

' मोकळेपणाने सांगायचे तर , मला नाही वाटत की मी पाच  सेकंदानंतर तुमचा प्रतिक्रार करू शकेन ' , ती .

"' तुम्ही चुक करताय ' , तो काहीतरी आकड्यांची जुळवाजुळव करत उपहासाने उत्तरला. खरं सांगायचं तर तुम्ही पाच सेकंदात काय तर अनेक दशलक्ष

सेकंदानंतर सुरक्षीत व्हाल कारण तुम्ही एक पवित्र देवदूत आहात " , तो तिच्या शरीरावर नजर फिरवत म्हणाला .

त्याने अशा अचानक केलेल्या स्तुतीमुळे तीला अचानक तणाव वाटू लागला आणि ती बेशुद्ध पडेल असेच काहीसे तीला वाटले .

तो पुढे म्हणाला ," खर तर तुमच्या सौंदर्यामुळे मी इतका भारावून गेलोय की खऱ्या अर्थानं पहिल्या नजरेतलं पहिलं प्रेम म्हणजे नक्की काय ? ते आता कळले आहे . "

त्याने आपली नजर थोडीशी झुकवत स्वतःच्या हातातल्या सिगारेट कडे पाहिले .

मध्येच तो म्हणाला ," खरं तर तुम्ही माझ्यासाठी ईथे आलेल्या नसून माझ्या जॅझच्या संगिताच्या प्रेमापोटी आला आहात . आणि अजून एक , तुमच्यासारख्या कितीतरी तरुणींना यातला  फरक कळत  नाही की त्या माझ्यावर नाही तर माझ्या संगीतावर प्रेम करतात . "

त्याला वाटले की ही तरुणी प्रामाणिक आहे कारण ती सतत त्याच्या गाण्यांच्याच शोधात असते आणि तिच्या घरात त्याचीच गाणी ती दिवसरात्र ऐकत होती.

 

आता ली फी च्या नादात ती हयू ला पूर्णपणे विसरली आणि तिने  त्याचा आणि त्याच्या प्रेमाचा त्याग केला . आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा पश्चाताप न करत बसता तीने आपले शरीर त्या संगीतकाराला समर्पीत केले. संगीतकारही मागचापुढ्चा विचार न करता तिचे शरीरसुख उपभोगत होता . खरं तर ती त्याच्या आयुष्यात नशीबाने किंवा योगायोगाने नव्हे तर त्याच्यावरच्या प्रेमाने आणि त्याला मिळवण्याच्या हेतूने आली होती . आणि तिच्या हेही लक्षात येत नव्हते की तो तिचा फक्त एखादया खेळण्यासारखा वापर करत होता , जसे या आधीही त्याने अनेक तरुणींचा केला होता . तीने त्याला आपलं बनवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले परंतू ती त्याला आपल्या काबूत आणू शकली नाही . एके दिवशी तिला त्याच्या बेडरुममध्ये जेंव्हा दुसऱ्या मुलीच्या उपस्थितीचा पुरावा सापडला तेंव्हा ती खुप चिडली आणि तिथून रागारागाने बाहेर पडणार ईतक्यात -

 तिचं चिडणं , रागावणं तो शांतपणे पाहत  अतिशय शांतपणे तो म्हणाला - "खरं सांगायचं तर तुम्हा मुलींपेक्षा मोबाईल फोन चांगला ज्याला नको असताना तो वाजला तर त्याला बंद करता येते , किंवा एकाचवेळी आपण दोन किंवा अधिक फोन वापरू शकतो आणि ते ही एकमेकांच्या मत्सराशिवाय ! "

 हे ऐकताच तिची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याला एक जोरदार चापट मारून ती रागारागाने बाहेर पडली.

 तीला त्याची खुप सवय झाल्यामुळे त्यानंतर चा त्याच्याशिवाय च्या पहिल्या दिवशी तिला खुप त्रास झाला , पण तिने स्वतःला सावरले आणि ती शांत राहिली . कारण तिला असे वाटत होते की ज्याप्रमाणे तिला त्याची सवय झाली आहे आणि त्याची आठवण येत आहे तशीच त्यालाही येईल आणि प्रणयाने व्याकूळ होऊन तो तिला फोन करेल . पण तीन - चार दिवस उलटले तरी त्याने तिला फोन केला नाही .

 शेवटी कंटाळून तिनेच परत त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला . आणि ती गेली . दरवाजा बंद होता पण त्याने त्याच्या घराची एक किल्ली तिच्याकडे दिलेली असल्यामुळे तीने दरवाजा उघडला आणि आत गेली. तिथे एका पेपरवेटच्या खाली काहीतरी लिहलेला कागदाचा तुकडा तिला दिसला . त्यावर लिहले होते , " गुडबाय ! माझ्या अनुपस्थि बद्दल मी दिलगीर आहे . " " मी माझ्या संगीताच्या कार्यक्रमासाठी जर्मनीला गेलो आहे . " पण त्यावर कुणाचेच नाव नव्हते त्यामुळे ते कुणासाठीही असू शकते . त्यामुळे चिडून बॅख डॅनने त्याला फोन , मेल करण्याचा प्रयत्न केला परंतू त्याला त्याच्याकडून काहिही उत्तर आले नाही .  स्वतः चाच राग येऊन बॅख डॅन स्वतःशीच पुटपुटली :

'"बिचारी ! बॅख डॅन तु त्याच्यालेखी कोण आहेस ? "

ती त्याच्याशिवायच्या एकटेपणाला कंटाळलेली होती . त्यामुळे परत न जाता तिने तिथेच त्याच्या घरात राहण्याचा विचार केला. आणि ती अखंडपणे त्याची वाट पाहत राहिली . तीथे त्याच्या सगळ्या वस्तू , त्याची पुस्तके , अनेक प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्स , खुप सगळे संगीताचे त्याने केलेले परिक्षण ... सगळं सगळं अस्ताव्यस्त पडलेले होते - जणू तो सगळं विसरला होता. त्या वस्तूही आणि तिलाही !

 

बघता बघता एकशे एकोन्नवद दिवस झाले होते आणि अजून किती दिवस वाट पहावी लागणार - तिला काहीच ठाउक नव्हतं .

शेवटी एक दिवस तो घरी परत आला . आणि तिला तिथे पाहून अत्यंत आनंदित झाला कारण आजपर्यंतच्या त्याच्या आयुष्यात आलेल्या एकाही स्त्री ने इतकेदिवस न कंटाळता त्याची वाट पाहिलेली नव्हती ! अत्यंत आवेगाने हातातले सामान टाकून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.

 

अचानक तो उठला , रुममध्ये संगीत चालू नव्हते म्हणून त्याने तिथे पडलेल्या कॅसेट्सच्या ढिगार्‍यातून एक कॅसेट उचलली आणि लावली . ते एक सुमधूर गीत होतं एला फिट्झगेराल्ड ने गायलेलं! त्या मधूर धून मुळे खोलीतलं वातावरणही पूर्णपणे पालटलं होते . खोलीच्या मध्याभागी संगमरवरी फरशीवर उभे राहून तो तिच्याकडे आपले बाहू पसरून पाहत होता. त्या सुंदर मंद निळ्या प्रकाशात तो संगमरवरी पुतळ्यासारखा भासत होता.

" ली फी ! " तीने रागाने हाक मारली.

पुढे काय झाले ते तिलाच आठवत नव्हते . परंतू त्या भयाण मध्यरात्री ती रस्त्याच्या मधोमध उभी होती . आणि तिच्या लक्षात आले की एखादया मुलीसोबतचे शरीरसंबंध संपले की तो तिला हकलून देत असे आणि त्यातून त्याला जॅझची नवीन धून निर्माण करण्याची प्रेरणा मिळत असे .

''नायालक माणूस ! " ती त्याला शिव्याशाप देत स्वतःवरच चिडत अनवानी पायांनी त्या निर्जन रस्त्यावर धावत सुटली.

                          ***

तिने आता स्वतःला त्याच्याकडे जाण्यापासून रोखण्याचा खुप प्रयत्न केला . काही दिवसांनंतर ती हयू कडे परत गेली आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी हयू ची मदत मागितली त्यासाठी तीने स्वतःचे शरीर त्याला देऊ केले .

हयू ने सुध्दा तीच्या या म्हणण्याचा पूर्ण मनापासून आणि आनंदाने स्विकार केला . बाख डॅन ने त्याच्या उत्कटतेला एखाद्या रॉकेटच्या लाँचिंग पॅड सारखे वापरले जेणेकरून ती उंच आणि उंचच उडू शकत होती मन तृप्त होईपर्यंत.  तिच्या या उत्कटतेला पाहून ह्यू स्वतःशीच पुटपुटला :

" सुंदर स्त्रिया जरा लहरीच असतात . "

आणि मुद्दा हा आहे की  , " ती मला मोहित करू शकते की नाही . "

 

अशा प्रकारे ती दोन पुरुषांच्या मध्ये अडकली गेली होती : एक तो जो तिच्यावर प्रेम करतो आणि दुसरा तो ज्याच्यावर ती प्रेम करते .

 

काही आठवडे ह्यू सोबत घालवल्यानंतर ती परत त्या संगितकाराकडे परत गेली कारण तिच्या मते तीला तिच्या गैरवर्तनाची प्रचिती आली होती . पण त्याने तिच्याकडे लक्षच दिले नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे ती त्याच्यावर ओरडली . पण तो मात्र अगदी निर्विकारपणे तिच्याकडे पाहत होता. रागाच्या भरात तिने टेबलावरचा मसिकांचा ढीग खाली ढकलला आणि अचानक तिच्या पायाजवळ एक प्लॅस्टिकची फाईल पडली . तिने ती उचलली आणि तिला त्या फाईलच्या मध्यभागी चिकटवलेले IS0 असे शब्द असलेले एक स्टिकर दिसले . तो अगदी धावतच तिच्याकडे गेला आणि ती फाईल त्याने तिच्याकडून जवळजवळ हिसकावलीच . आणि ती फाईल एका कपाटात ठेवून त्याने कपाटाचे दार कुलूप लावून बंद केलं .

" ते काय आहे? " तिने त्याला विचारले .

" तुला माहित असण्याची गरज नाही . " तो उत्तरला.

" मी तुझ्या ईतक्या जवळची होऊ शकत नाही , " तिने दबक्या आवाजात विचारले .

" मला समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही . " तो .

" पण असं का? " ती .

" अगं सुंदर आणि निरागस मुली ! फक्त माझ्यासोबत च्या दुर्मिळ क्षणांचा आनंद घे . असे मुर्खासारखे प्रश्न विचारत बसू

नकोस . " तो .

" तू खुप निर्दयी माणूस आहेस . " ती निराश होऊन म्हणाली .

" तुला माहितीय माझ्याकडे हृदय आहे ! " तो हसत म्हणाला .

" जर तु माझे संगीत ऐकण्यासाठी त्रास घेतला असशील तर त्याच्यातीला गोडवा तुला नक्कीच जाणवला असेल . माझे संगीत पूर्णपणे स्वार्थी आहे ते मला सतत हाक मारत असतात आणि मी माझे हृदय   त्यांना देतो - माझी ईच्छा असो वा नसो . माझ्यासाठी माझे हृदय आणि मन त्यांना सोपवण्यातच मला आनंद मिळतो ."

" मग माझं काय ? " तिने विचारलं , " मी त्या एका तुकड्यालाही लायक नाही ?"

" माझे उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे . " तो म्हणाला .

" दुसऱ्या स्त्रियांबद्दल काय? " तिने पुढे विचारले .

" अगदी तसेच ! तंतोतंत ! " तो .

" तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल काय ? जिने तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे केले ? "

" वास्तविक बायका सतत भूतकाळाचाच विचार करतात शोधत राहतात. पण त्या काळातील एक मुख्य पात्र म्हणून मला तिचे पूर्ण नावही आठवत नाही . हो ते प्रेम होते अगदी खरं प्रेम . अगदी दुर्मीळ , एक सुवर्णसंधी जणून देवाचीच देणगी ! पण अगदी सहज आलं आणि अगदी सहज निघून गेलं . आणि तुला माहितीय मी तिच्यासाठी एकदा जीव द्यायचा सुद्धा प्रयत्न केला होता . मी प्रेमात तिच्याशी अगदी एकनिष्ठ होतो . तिच्यासाठी अगदी काहीही करायला तयार होतो - अगदी जीवाची पर्वा न करता ! मग आता तू सांग मी तिला स्वर्ग देईन की नरक ? मला माहित नाही पण मुद्दा असा होता तिला मी नको होतो आणि शेवटी तिने मला सोडून दिले एवढेच . "

" ती कशी आहे ? सुंदर आहे का ? "

" सुंदर " , त्याने अतिशय हळू आवाजात तिचाच प्रश्न केला .

" साहजिकच तसंही मी काही सौंदर्यशास्त्र तज्ञ नाही की मूर्खपण ! ज्यामुळे ती  सुंदर आहे किंवा नाही हे मला कळेल . पण एकंदरीत तिने मला जगण्यासंदर्भात काहीच दिलं नाही . त्याउलट ती खूप स्वार्थी होती आणि ती तेच करत होती ज्याच्यामुळे तिला मनापासून आनंद होत असे . तिला जॅझची आवड होती , शिवाय तिने प्रसिद्ध जॅझ संगीताचे अनेक अल्बम गोळा केले होते ती अगदी दिवस रात्र जॅझ संगीतातच रमत होती किंबहुना जॅझ शिवाय ती काहीच करू शकत नव्हती . कुतूहलाची गोष्ट म्हणजे ती कुठलाही खेद न बाळगता एखादया जॅझ च्या नवीन अल्बमसाठी माझी देवाणघेवाण करायला तयार होती . खरं म्हणजे तिला माझ्या बाबतीत काहीच वाटत नव्हते . आणि विरोधाभास म्हणजे जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा त्या माझ्या दुःखाच्या काळात तेच जॅझ संगीत माझं जगण्याचं कारण बनले . आणि मी एवढा महान संगीतकार झालो त्यामुळे माझे नशीबही पालटले म्हणून पुन्हा एकदा मी तिचा आभारी आहे की तिच्यामुळे मी माझं प्रेम माझा आत्मा माझी स्वप्न माझं शरीर साधारणपणे माझ्या मालकीचं सगळं काही माझ्या या संगीतासाठी समर्पित केलं . कळतय तुला ? " , असं म्हणून तो एखाद्या दारुड्या माणसाप्रमाणे हाताने जोरात तिचे खांदे  दाबत आणि एकटक तिच्याकडे पाहत राहिला .

 

                          ***

तर , इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर तिला जे हवं होतं ते तिला मिळालं होतं ! तिच्या हातात प्रेग्नेंसी किट होतं, आणि त्यातल्या लाल रेषा तिच्या गरोदरपणाबद्दल खात्री देत होत्या . बाख डॅनला खुप आनंद झाला . इतक्या दिवसांच्या प्रयत्न आणि आपेक्षानंतर तिच्या आत त्याचा गर्भ रुजत होता .

" ले फी आता नक्कीच तू माझ्या जाळ्यातून सुटू शकत नाहीस . " ती स्वतःशीच कुजबुजली .

" ले फी , माझ्याशी लग्न करशील ? " तिने मोठ्यांदा हसत त्याला विचारले .

" तुझ्याशी लग्न ? असं का? " त्याने तिला थट्टेत विचारलं .

" कारण मी तुझ्यावर प्रेम करते " ती म्हणाली .

" हो ते मला माहित आहे ." त्याने तिच्याकडे पाहत सिगारेटचे मोठे पाकीट उघडले . " म्हणजे तू मला जिंकण्यात यशस्वी झाली आहेस हो ना ? " तो पुढे म्हणाला .

" तसं नाही ! तुझ्यावरच्या प्रेमातून मला हवी असणारी एक गोष्ट मला मिळाली

आहे " ती उत्तरली .

" तुला ती गोष्ट मिळाली आहे म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला ? " - त्याने विचारले .

" हे बघ ! " असं म्हणत तीने एक छोटासा कागद त्याच्या पुढ्यात धरला त्यावर ती गरोदर असल्याचे लिहलेली दवाखान्याची पावती होती .

" कुणाची शय्यासोबत केलीस ? " आपली अर्धवट संपलेली सिगारेट फेकत त्याने विचारले .

तिने काही बोलण्यासाठी तिचे तोंड उघडले पण ती काहीच बोलली नाही .

" तो कागदाचा तुकडा माझ्यासाठी काही कामाचा नाही " . अतिव दुःखाने त्याने तिला सांगितले , " तो ज्याचा आहे त्याच्याकडे तो घेऊन जा आणि मला माफ कर मला असं वाटायला लागलं होतं की तू माझ्यावर खरच प्रेम करत आहेस . "

" तू असे कसे म्हणू शकतोस ? " तिने विचारले .

तो एकही शब्द बोलला नाही . तो उठून त्या कपाटाकडे गेला ज्यात त्याने ती ISO असं  स्टिकर चिकटवलेली ती फाईल ठेवली होती . हळूहळू त्याने ती फाईल उघडली आणि तिच्यासमोर ठेवली - त्यात लाल सील लावलेले एक पाकीट होते . ते त्याने उघडले आणि तिच्या हातात ठेवले -

ते एक वैद्यकीय प्रमाणपत्र होते -

ज्यात तो वंद्य असल्याचे वंधत्व प्रमाणपत्र होते !

" हे माझे आरोग्य प्रमाणपत्र आहे - हे वाच म्हणजे तुला सत्य समजेल . " तो अगदी गांभिर्यानं बोलत होता .

आणि ती त्या बाजूच्या सोफावर धाडकन कोसळली .

                           ***

बाख डॅनने एक क्रुझर गाडी भाड्याने घेतली आणि ती उत्तरेकडील हा गिआंग पर्वत रांगांमधे प्रवासासाठी निघाली तिथल्या मिओ वॅक , लुंग कु , डाँग वॅन अशा सर्व तिला आवडणाऱ्या तिच्या बालपणातल्या गोड आठवणी असलेल्या पठारांवर फिरत राहिली.

" मी माझ्या गर्भात वाढणाऱ्या या बाळाच्या पित्याकडे ह्यू कडे परत जाऊ का ?" या प्रकरणाचा काळजीपूर्वक विचार करत स्वतःशी विचार लागली . कारण खरंतर  तिला त्याच्यासोबत कंटाळवाण्यापध्दतीने  जगण्याची भिती वाटत होती .

तिच्या दुर्देवाने तिने रचलेल्या सापळ्यात तीच अडकली गेली होती . ती सगळ्च गमावून बसली होती . तिच्या अपेक्षा तिचे स्वप्न सगळच धुळीला मिळाले होते . दुरुन तिला मृत्यूची हाक  ऐकू येत होती . तीने ड्रायवरला गाडी एका उंच पठाराकडे नेण्याची सुचना केली , तिथे तीने त्याला गाडीचे भाडे दिले आणि ती खाली उतरली आणि तिने त्याला गाडी वापस गावात नेण्याच्या सुचना केल्या . खरंतर तिच्या अशा वागण्यामुळे ड्रायव्हर तिला काही विचारू पाहत होता पण त्याच्या कडे तितके धाडस नव्हते . तो परत फिरला आणि ती मात्र पुढे आणि पुढे चालत गेली उंच आणि उंच शिखराच्या टोकापर्यंत पोचली . तिने खाली पाहिले आणि तिला जाणवले की तिच्या आजूबाजूला असलेला पर्वत हा गिआंग  प्रांतातील सर्वात सुंदर पर्वत आहेत . आणि तिच्या मृत्यूसाठी तिने निवडलेलं हेच ठिकाण योग्य असेल जेणेकरून ती तिचे निरागस प्रेम या सुंदर , रम्य परिसरात कायमचे जपून ठेवेल .

वार्‍याने चांगलाच जोर पकडला होता . आणि तिचे सुंदर लांब केस एखादया उनाड अवखळ ढगासारखे मागे उडत होते तिने तिचा हात तिच्या गर्भावरून फिरवला , ती विचार करत होती ते कसे वाढेल ? ती सुंदर आहे तोपर्यंतच ती ते नष्ट करेल . आणि शेवटी जोर जोरात हसत ती त्या कड्यावरून खाली कोसळली .

 ****


 

अनुवाद : प्रा . डॉ . क्रांती विठठलराव मोरे

इंग्रजी विभाग

शिवाजी  महाविद्यालय , रेणापूर जि . लातूर

7588206494

****************************************


                   : साहित्याक्षरचे नवी दिमाखदार प्रकाशने :


परतवाड्याचे प्रसिद्ध कवी गजानन मते यांचा नवा कोरा संग्रह .

संपर्क : 7066301946

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साळेगावकरांचा 'प्रसन्न प्रहार '

अखेर मराठीत महाकवी निर्माण झाला

धनवंती रामाराव