हमन इश्क है मस्ताना
विमलेश त्रिपाठी ( कोलकाता )
(विमलेश त्रिपाठी हे हिंदीतील महत्त्वाचे कवी व लेखक आहेत. दरवर्षी जानेवारीला ते ' अनहद ' नावाचा साहित्य उत्सव घेत असतात . सध्या त्यांनी लिहिलेली ' हमन इश्क है मस्ताना ' ही कादंबरी विशेष चर्चेत आहे. माध्यमांचा स्फोट झाल्यानंतर स्त्री - पुरुष संबंध आणि विवाहसंस्थेवर होणाऱ्या परिणामावर ही कादंबरी भाष्य करते. या कादंबरीचा अनुवाद साहित्याक्षर प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत आहे . त्या कादंबरीचे हे पहिले प्रकरण . अनुवाद करत आहेत डॉ. संजय बोरुडे .- प्रकाशक )
****†***************"*"""""""*"""""****
एक
माझे मन दु:खी होते. असे वाटत होते की कोणीतरी दूर समुद्राच्या पलीकडून मोठ्याने हाक मारत आहे - एक आत्मीय सगा माझ्यापासून विभक्त झाला आहे. मला ताबडतोब तिकडे जायचे होते पण मी वास्तवाच्या कठोर भूमीवर गुडघ्यात डोके घालून शांत बसलो. ऑफिसमधल्या एक मात्र कॉम्प्युटर टेबलवर विखुरलेले सरकारी कागद आणि जुन्या फाईल्सच्या मध्ये. मला माहीत आहे,दुरून येणारा हा आर्त आवाज माझ्या आतल्या कुठल्यातरी कवितेचा आहे. ती काही वेळाने माझ्यासमोर येईल - मला जबरदस्तीने ढवळून टाकेल. मला अस्वस्थ करून, सर्वत्र हादरवून टाकणारी, आंदोलित करील.
अशा दु:खाच्या आणि मानसिक आंदोलनाच्या क्षणी माझ्यात एक कविता जन्माला येते – म्हणूनच मनात या उदासीचे अनेक पदर आहेत. सुरुवातीच्या दिवसांत ती हे थर सोलून आत आली होती. तिला कवितेची आवड नव्हती पण तिने कथा या वाङ्मय प्रकारात डॉक्टरेट केली होती. तिने महिला कथाकारांचा एक संपूर्ण समूह वाचला होता - पूर्ण गांभीर्याने, मी तिच्याइतके वाचलेले नव्हते - माझे महाविद्यालय आणि विद्यापीठ काळातील वाचन अजूनही मला कमी येत होते. तिच्याकडे तर्क करण्याची अद्भुत क्षमता होती, तिच्या तीक्ष्ण प्रश्नांनी मला प्रथम प्रभावित केले. खरं तर तिने कुठूनतरी माझ्या कविता वाचल्या होत्या आणि त्या कवितांतून झिरपणाऱ्या उदासीबद्दल ती चर्चा करत होती – कवितेत ही उदासी का आहे? आणि मी सपाटपणे आणि घाईघाईने म्हणालो होतो की,जीवनात आणि वर्तमानात दुःख असते, म्हणून कवितेतही आहे. परंतु
इथे येण्याचा फायदा असा झाला की मला अनेक भन्नाट माणसे भेटली - अनेक नवे लोक भेटली. माझे अनेक वर्गमित्र' युनिव्हर्सिटीतील सहाध्यायी . त्यात आणखी असेही काही गावाकडचे लोक होते जे आता सुरत, मुंबई, दिल्ली किंवा अरबस्तानचे रहिवासी झाले आहेत. तेही इथे सापडले.
तीही इथे सापडली होती .
तिने 'हाय' म्हटले आणि माझ्या उत्तराची बराच वेळ वाट पाहात राहिली.
बऱ्याच वेळाने मी पण तिला 'हाय' म्हणालो. मग मी तिचा फोटो पाहण्यासाठी तिच्या प्रोफाईलवर क्लिक केले. पण तिथे सूर्यफूल लावलेले दिसते, मी निराश झालो. ती नावावरून तर मुलगी वाटत होती - शिवांगी. मी तिच्या प्रोफाइल च्या आणखी इमेजेस पाहिल्या. त्यात एक फोटो होता. फिकट झाल्यानंतर स्कॅन केलेला आणि नंतर अपलोड केलेला. फोटो जरा अस्पष्ट होता खरा पण चित्रातलं हसू स्पष्ट जाणवत होतं. याचा अर्थ दिसायला ती अगदी 'ही ' नव्हती.
'तुम्ही काय करता?' तिचा हा प्रश्न माझ्या इनबॉक्समध्ये येऊन पडला होता आणि मला थोडा झटका बसला. कारण जर मला तिने ' हाय ' केले तर तिला ठाऊक असले पाहिजे की मी एक प्रस्थापित , तरुण लेखक आहे. 'तुम्ही काय करता ' असा प्रश्न कोणी मला विचारला की, माझी आजवरची लेखन-वाचनाची मेहनत वाया गेली असं वाटायचं.मी कसला ढेकळं लेखक? जर मला कोणी ओळखतच नाही आणि विचारतही नाही , असं उद्विग्न व्हायचं.
"बस, थोडं लेखन-वाचन आणि नोकरी. माझी 'अनुनाद' ही दीर्घ कविता वाचलीस का?"
''नाही...''
''मी लिंक देत आहे, तुम्ही वाचा आणि सांगा कशी आहे ते "
"हो, मी कविता वाचत नाही. मी कथेमध्ये संशोधन केले आहे. माझा कल कथासाहित्याकडे आहे."
"वाचा, तुम्हाला आवडेल."मी त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये 'अनुनाद' ची लिंक पेस्ट केली होती. या क्षणी मी या मुलीला प्रभावित करण्याचा दुसरा कोणताही मार्ग मला सुचला नाही . कविता वाचून तिला कंटाळा येईल आणि कविता समजली नाही ,असे म्हणेल. मग हळुहळु इतर मुलींप्रमाणे तीही माझ्यापासून दूर जाईल. हा माझा तिच्याशी झालेला पहिला संवाद.
रात्री बारा वाजता जेव्हा बायको झोपली तेव्हा मुलगा खेळून दमला होता आणि तिच्या कुशीत झोपला होता. मी कॉम्प्युटरवर होतो. आधीचा काळ असता तर माझ्या हातात एखादं चांगलं पुस्तक दिसलं असतं - निर्मल वर्मा किंवा विनोदकुमार शुक्ला किंवा कृष्णा सोबती. पण ही सवय सुटली. हा प्रकार सुमारे दहा वर्षांपूर्वी असायचा आणि आता फेसबुकवर प्रोफाईल बनवल्यापासून रिकामा वेळ इथेच जाऊ लागला. त्याआधीही याहू मेसेंजर असायचे. याहू मेसेंजरवर मुलींशी गप्पा मारताना मी संगणकाच्या कीबोर्डवर हाताच्या वेगवान हालचालींची कला शिकलो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी याहू मेसेंजरवर चॅटिंग करताना किती मुली आणि महिलांशी वर्डसेक्स केलेला. हे कधी माझ्या स्वतःच्या इच्छेने होते तर कधी उंडग्या मुलींच्या इच्छेनुसार ज्या याहू मेसेंजरवर 'हंटिंग फॉर पुरूष' फिरत होत्या.त्यांची ओळख लपवून आणि अश्लील आणि कामुक बोलून मनोरंजन करायच्या. पण तो आता भूतकाळ झाला होता. मी अशा प्रकारच्या शब्दसंभोगांमुळे कंटाळलो होतो. आता मला आणखी एका स्पेस ची गरज होती जिथे लोक त्यांची ओळख लपवत नाहीत तिथे माझ्या अस्वस्थ आत्म्याला शांती मिळेल. अशी जागा , जिथे मी माझ्या आयुष्यातील सर्व ताणतणाव कचर्यासारखे टाकून देऊ शकतो.
इंटरनेट ब्राउझ करताना अचानक फेसबुकसारखे काहीतरी हातात आले. सुरुवातीला मला काहीच समजले नाही. मला वाटले की हे 'Orkut' सारखे काहीतरी असेल जेथे अनेक लोकांचे प्रोफाइल आहेत आणि त्यांची वॉल अतिशय सुंदर चित्रांनी भरलेली आहे. मी तिथे गेलो - माझे प्रोफाइल देखील तयार केले, परंतु थेट चॅटचा रस्ता सापडला नाही.
सुरुवातीच्या काळात Yahoo Messenger वर एखादी मुलगी विचारायची, "तुम्ही Orkut वर प्रोफाईल तयार केले आहे का?" यावर मी सरळ 'नाही' म्हणायचो. त्यामुळे अनेक मुलींची निराशा व्हायची. नंतर मी ऑर्कुटवर माझी प्रोफाइल बनवले आणि तिथे अर्धे ओळखीचे मित्र सापडले, पण त्यांच्यापेक्षा मला मुलींच्या चकचकीत प्रोफाईलमध्ये जास्त रुची होती आणि आर्कुट सांगायचे की तुम्ही या सुंदर मुलींशी मैत्री करू शकता.
मी तिथल्या अनेक मुलींना मैत्रीचे प्रस्ताव पाठवले, पण मला आठवते की त्यातल्या काही मुलींनीच ते स्वीकारले होते आणि 'तू कशी आहेस, काय करतेस आणि कुठे राहतेस ? 'यापेक्षा पुढे काही संवाद झाला नाही....
मी त्यांना अभिमानाने सांगायचो की , मी एक लेखक आहे, मी कविता आणि लघुकथा लिहितो. खरं तर तेव्हा मी नव्यानेच लिहायला सुरुवात केली होती.एका दिवसात दहा दहा कविता लिहायचो आणि आनंदी व्हायचो. या कविता लोकांसमोर आल्यावर ते स्तब्ध होतील आणि मी रातोरात प्रसिद्ध होईन, असं मला वाटायचं. लेखकांचे अनेक प्रेमप्रकरणं असतात असे मी ऐकले होते. त्याच्या कविता ऐकून मुली त्याच्या प्रेमात पडू लागतात. या गोष्टीने मलाही कुठेतरी गुदगुल्या व्हायच्या आणि मी अधिक उर्जेने लिहायला लागायचो.
माझ्या तोंडून ' लेखक ' हा शब्द ऐकून मुली घाबरायच्या. काहींना वाटेल की मी फेकतोय. त्यांना प्रभावित करण्यासाठी मी हे सर्व बोलत आहे. तरीही मी तिथे जास्त वेळ थांबलो नाही आणि परत Yahoo Messenger वर गेलो. परंतु तुम्ही याहू मेसेंजरवर कोणाशीही बौद्धिक वादविवाद करू शकत नाही, म्हणजे मी लेखक आहे या वस्तुस्थितीने प्रभावित झालेला कोणीही मला तिथे आढळला नाही. तिथे लोक मुली शोधायला यायचे. अशा लोकांची संख्या तेथे सर्वाधिक होती.जे ' फट्टू ' प्रकारचे लोक होते - जे गल्लीत मान खाली घालून चालत असत - मुलींशी बोलण्यास देखील लाजणारे आणि हस्तमैथुनाच्या सवयीचे बळी.
इथे आल्यावर अचानक त्यांची ' फट्टूगिरी ' नाहीशी व्हायची आणि उघडपणे मुलींना प्रेमाचे प्रस्ताव द्यायचे. मुलगी नीट बोलली तर फोन नंबर मागायचे
नंबर सापडला की एसएमएसची प्रक्रिया सुरू असायची आणि मग गोष्ट कुठल्यातरी रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये भेटीपर्यंत पोहोचायची .
माझे मन तिथे फार काळ टिकले नाही. होय, मी तिथे मुलींशी गप्पा मारल्या. त्यांच्याकडून नंबरही घेतले. बायकोपासून लपून गच्चीवर एकट्यानेच बोललो. अशा मुली आधी खूप सभ्य पद्धतीने बोलायच्या पण काही दिवसांनी अचानक त्यांचा आवाज बदलायचा. एकदा एक मुलगी फोनवर असे वागली की मी शहारलोच .
"तू फोन सेक्स करशील का?" तिने ऑफर केली. ज्याला कोणत्याही प्रकारे नैसर्गिक म्हणता येणार नाही अशा गोष्टी तिला शब्दांतून करायच्या आहेत ,हे समजायला मला वेळ लागला नाही.
"हो." मी चाचरलो. माझ्याशी अशी मुलगी पहिल्यांदाच बोलत होती.
यानंतर तिचा आवाज खूप कामुक झाला, ज्यामुळे मी हळू हळू पाघळत गेलो.आम्ही बराच वेळ एकमेकांना शब्दांनी ओरबाडले. ती जास्त आणि मी कमी उत्तेजित .
दरम्यान अचानक फोन कट झाला .
ती रोज रात्री फोन करायची. ही प्रक्रिया तीन-चार दिवस चालली. त्या दिवसांच्या शेवटच्या दिवशी मी त्याला म्हणालो, "आपण कधी भेटू?"
" भेटू ? आताही आपण भेटतच आहोत आणि हे सर्व करत आहोत." "नाही, म्हणजे आपण हे सगळं प्रत्यक्षात कधी करणार आहोत?"
'करेंगे, उसका भी समय आएगा.''मुलगी म्हणाली आणि तिचा कॉल डिस्कनेक्ट झाला.
दुसऱ्या दिवशी रात्री मी तिच्या कॉलची वाट पाहत होतो, पण तिने फोन केला नाही. मी तिला अनेकदा फोनही केला, पण फोन बंद आला.बरेच दिवस मी अस्वस्थ होतो.पुन्हा पुन्हा फोन करत होतो पण तिचा बंद झालेला फोन पुन्हा चालू होत नव्हता.
मी अशा अनेक घटनांचा उल्लेख करू शकतो. कदाचित तुम्हाला अशा गोष्टींमध्ये रस नसेल. पण तुम्हाला स्वारस्य नसले तरी मला जे आठवते ते मी तुम्हाला सांगेन.
तर मी सांगत होतो की ती फेसबुकवर सापडली होती. कदाचित मी तुम्हाला तिचे नाव शिवांगी असल्याचे सांगितले असेल, जर नसेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तिचे नाव शिवांगी होते आणि तिने हिंदी साहित्यातील स्त्रियांनी लिहिलेल्या कथांवर पीएचडी केली होती-
विश्वास ठेवा, ती माझ्या इतक्या जवळ येईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. तिच्या एकाकी आणि अपरिचित प्रेमाने माझ्यातील पोकळी भरून काढण्याइतपत. खरं तर मी प्रेमविवाह केला आहे आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मी हे लग्न माझ्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध केले आहे, हे ही मला सांगितले पाहिजे. माझे अनेक मुलींशी अर्धे अधुरे प्रेमसंबंध आले. नाही असे नाही आणि हेही खरे आहे की मी कितीतरी मुलींना प्रेमाचे प्रस्ताव दिले आणि ते नाकारल्यानंतर माझ्या अंधाऱ्या कोपऱ्यात परतले आहेत.
पण ती आली. दगडावरच्या कळीप्रमाणे, कोरड्या पडलेल्या म मुळातून उगवण्या नवजात कोंबाप्रमाणे .. एखादे अशक्य स्वप्न प्रत्यक्षात यावे तसे ती आली .
****


चांगला विषय..
उत्तर द्याहटवालेखक, अनुवादक व साहित्याक्षरचे हार्दिक अभिनंदन !!