धनवंती रामाराव
धनवंती रामाराव : कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या जनक
साधारणपणे, जग मार्गारेट सेंगर यांना जन्म नियंत्रण जागृती कार्यक्रमांची प्रणेते म्हणून ओळखते. तथापि, भारतातील कुटुंब नियोजनाचे निर्माते, महिलांच्या पुनरुत्पादक हक्कांसाठी कट्टर प्रचारक आणि आंतरराष्ट्रीय नियोजित पालकत्व महासंघाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष धनवंती रामाराव यांच्या प्रयत्नांचा देश विसरला आहे. स्त्रीवादी आणि दूरदृष्टी असलेल्या धनवंतीला हे जाणवले की देशातील बहुतांश समस्या कुटुंब नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाल्या आहेत.
त्यांच्या मेहनती आणि एकाग्र प्रयत्नांमुळे, 1952 मध्ये देशव्यापी कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत विकसनशील देशांपैकी पहिला देश बनला. कार्यक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये जन्म नियंत्रण, सुरक्षित मातृत्व, मुलांचे संगोपन, कुटुंब कल्याण आणि बालविवाहाविरोधातील मोहिमा यांचा समावेश आहे. आपण धनवंती रामाराव, पद्मभूषण विजेत्या म्हणून आणि भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे संस्थापक म्हणून त्यांना कायम लक्षात ठेवूया.
महिलांच्या स्वावलंबनाने त्यांच्या आयुष्यातील बहुतांश कार्याला आकार दिला.धनवंती रामा राऊ यांचा जन्म 1893 मध्ये हुबळी येथे (कर्नाटक) धनवंती हांडू एका काश्मिरी कुटुंबात झाला. हुबळी येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. क्वीन मेरी कॉलेजमध्ये उच्च शिक्षण देणार्या पहिल्या भारतीय महिलांपैकी एक होत्या. अशा काळात त्यांनी शिक्षण घेतले जेव्हा स्त्रियांनी शिकणे आणि अभ्यास करणे हे परंपरेच्या विरुद्ध होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. पुढे मद्रासमध्ये आपले मित्र बेनेगल यांची भेट घेतली आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला . लग्नानंतर नंतर ते जोडपे लंडनमध्ये स्थायिक झाले. स्वतःचा फ्लॅट घेतला . धनवंती यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे की 1930 च्या दशकाच्या सुरुवातीला परदेशात फ्लॅट खरेदी करणे खूप कठीण होते.
धनवंती यांनी सुरुवातीच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रचार करणाऱ्या अनेक संस्थांसोबत काम केले. सरोजिनी नायडू यांच्या आदेशानुसार, त्यांनी मताधिकार आणि समान नागरिकत्वासाठी महिलांच्या आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यांनी वुमेन्स इंडियन असोसिएशनचीही स्थापना केली, ज्याचा उद्देश भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांत राहणाऱ्या महिलांना स्त्रीवादी मुद्द्यांवर एकत्र आणण्याचा होता.
धनवंती यांचा भारतीय महिलांच्या आत्मनिर्भरतेवर ठाम विश्वास होता आणि या विचारानेच त्यांच्या आयुष्यातील कामाला आकार दिला. ब्रिटीश संसदेच्या प्रसिद्ध सदस्या एलेनॉर रॅथबोन यांनी आयोजित केलेल्या 'भारतीय सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या परिषदेत' त्यांच्या संक्षिप्त भाषणात त्यांनी भारतीय महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या अंगानेच मांडणी केली .
१९४१ मध्ये, देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना, धनवंती मुंबईला परतल्या. देशातील महिला संघटनांसोबत काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, परिसरातील झोपडपट्ट्यांच्या दुर्लक्षित आणि दयनीय परिस्थितीमुळे तेथील जनता त्रस्त होती. त्याच वेळी, त्यांनी निरीक्षण केले की बंगालच्या दुष्काळासारख्या परिस्थितीमुळे देशात परिस्थिती अधिकच बिकट होत आहे .वाढती आर्थिक दरी आणि गरिबी असूनही बाळंतपणावर बाळंतपणे होतायेत हे पाहिले. परिस्थिती नसताना घरात खाणारी तोंडे वाढली तर कसे हाल होतात याचाही अभ्यास केला.
या समस्येवर विचार करताना लवकरच त्यांच्या लक्षात आले की देशाच्या बहुतेक समस्यांवर गर्भनिरोधक हे एकमेव उत्तर आहे. त्यामुळे पारंपरिक समाजातील अज्ञानी आणि अशिक्षित लोकांना शिक्षण देणे हे धनवंतीसमोर पहिले आव्हान होते. त्या काळातील बहुतेक लोकांचा असा ठाम अंधविश्वास होता की मुले देवाच्या कृपेने जन्माला येतात आणि त्यावर नियंत्रण आणल्याने देवाचा कोप होईल कारण ते देवाच्या इच्छेविरुद्ध असेल. त्यामुळे धनवंती यांना आणखी प्रयास करणे भाग होते.
त्या महिला सबलीकरणाच्या कट्टर प्रचारक होत्या आणि त्यांचा असा विश्वास होता की मुले जन्माला घालण्याचा निर्णय स्त्रियांच्या हातात असावा. जर स्त्रियांना पुनरुत्पादनाचा अधिकार असेल तर गर्भनिरोधक कार्य सोपे होईल. त्यामुळे धनवंती यांनी जन्म नियंत्रण कार्यक्रम सुरू केला, जो त्यांच्या मते राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला. १९४९ मध्ये त्यांनी ' फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया 'ची स्थापना केली. तेव्हा ही भारतातील लोकसंख्या नियंत्रण क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी गैर-सरकारी संस्था होती. त्यांच्या तीव्र जागरूकता प्रयत्नांमुळे, भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमांना जागतिक मान्यता मिळाली आणि अनेक देशांनी त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वीकार केला.
विशेष म्हणजे, त्यांनी पुरुषांना त्यांच्या कुटुंब नियोजन जागृती कार्यक्रमासाठी लक्ष्य केले कारण स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी उपचार सोपे आहेत. शिवाय, जर पुरुषांना लहान कुटुंबाची किंमत कळली, तर ते एकतर उपचार घेतील किंवा त्यांच्या पत्नींना तसे करण्यास प्रोत्साहित करतील. अशाप्रकारे, अर्धा दशलक्ष भारतीय पुरुषांनी ऐच्छिक नसबंदी करून घेतल्याचे श्रेय धनवंती यांनाच जाते.
कुटुंब नियोजनाच्या विरोधात असलेल्या लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, महिलांचे सक्षमीकरण केले आणि पुरुषांना जन्म नियंत्रण जागृती कार्यक्रमात सहभागी करून घेतले. म्हणूनच त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धनवंतीने १९७७ मध्ये त्यांचे ' ॲॅन इनहेरिटन्स: द मेमोयर्स ऑफ धनवंती रामाराव' हे आत्मचरित्र प्रकाशित झाले, वाचकांना तिच्या संस्मरणीय जीवन प्रवासातील अनोख्या मैलाचा दगड असलेल्या समृद्ध अनुभवांची ओळख करून देते. भारतीय कुटुंब कल्याण योजनांना सत्यात उतरवणार्या या अग्रगण्य महिलेची कहाणी आज मात्र राष्ट्रउभारणीच्या पानांमध्ये कुठेतरी हरपली आहे, हे खेदाने नमूद करावे लागते.
- डॉ. संजय बोरुडे ,
अहमदनगर .
९४०५ ००० २८०
****************************************""**"



Good article
उत्तर द्याहटवाफारच सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख सरजी, मनःपूर्वक अभिनंदन!
उत्तर द्याहटवाखूप छान sir, माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवागुड
उत्तर द्याहटवाBhari
उत्तर द्याहटवा