साळेगावकरांचा 'प्रसन्न प्रहार '
(साळेगावकरांच्या विडंबन संग्रहाचे आज ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते माजलगाव येथे प्रकाशन होत आहे. त्या निमित्ताने - साहित्याक्षर )
' प्रहार 'आणि तोही ' प्रसन्न ' हे कसं शक्य आहे? परंतु ही किमया साध्य केली आहे,प्रसिद्ध कवी आणि विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांनी. अनेक वर्ष प्रलंबित असलेला विडंबन कवितांचा संग्रह बाजारात आलेला आहे आणि त्या संग्रहाचे हे नाव आहे - प्रसन्न प्रहार. औरंगाबादच्या 'अभिसंधान प्रकाशना'ने हा देखणा विडंबनसंग्रह प्रकाशित केलेला आहे.
माजलगाव सारख्या मराठवाड्यातील एका तालुक्याच्या गावी राहून साळेगावकर यांनी कुणाला इजा न होता दोष दाखवून देणाऱ्या या उपहासिका तरल आणि अतिशय आणि प्रसन्नपणे निर्मिलेल्या आहेत. याचा साक्षीदार स्वतः मी सुद्धा आहे महाराष्ट्रात गाजलेला 'पुणे फेस्टिवल'चा मंच असो की परभणीचा 'शब्दसह्याद्री 'चा मंच असो, साळेगावकरांची कविता नेहमीच बहरत राहिली .भाष्य कविता किंवा विडंबन कवितांचा मराठी साहित्यामध्ये एक स्वतंत्र असा प्रवाह आणि परंपरा आहे. मात्र या कवितांचा अजून म्हणावा तेवढा अभ्यास झालेला नाही.
दैनिक लोकसत्ता , लोकमत , हास्यरंग दिवाळी अंक, ई टी.व्ही. साम टीव्ही , टीव्ही नाईन ,IBN लोकमत अशा आघाडीच्या वृत्तपत्रांतून आणि वाहिन्यांवरून अनेक कार्यक्रमांमधून लवकर यांनी स्वतःची स्वतंत्र अशी मुद्रा उमटवली आहे. जुन्या, गाजलेल्या गीतांचा अभ्यास करून त्याच चालीवर विडंबन बांधताना कुठेही वृत्तामध्ये अथवा मीटरमध्ये गडबड होणार नाही, याची काळजी घेऊन अतिशय नजाकतीने विडंबनाचा आशय पेरण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. त्यांची कविता प्रेक्षणीय असते. सादरीकरणात सहजता आहे. आवाज मधुर आणि सुरांची जाण असलेला आहे. म्हणून मूळ गीताइतकीच कांकणभर जास्त गोडी जाणवते. उगीचच अंगविक्षेप किंवा आक्रस्ताळेपणा नाही. त्यामुळे खरोखरच एक प्रकारची प्रसन्नता आविष्करणात जाणवते.
या संग्रहात फक्त ३१ विडंबने आहेत. मात्र आधी मूळ गीत आणि त्याच्याशेजारी विडंबन अशी रचना केल्याने रसिकांना मूळ गीत आणि विडंबन दोहोंचा आस्वाद घेता येतो.
त्यांच्या तुफान गाजलेल्या विडंबन रचना म्हणजे ' शूर आम्ही सरकार ' आणि ' बाधा ही आगळी ' . व्यवस्थेवर प्रसन्न प्रहार करताना ते लिहितात -
शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती ?
टोल गॅस आणि महागाईने प्राण घेतलं हाती ॥ धृ ॥
भाईच्या गुर्मीत जिरवली मतदानाची रीत
निवडणुकीशी लगीन लागलं तिकीटा संग प्रीत
लाख घोटाळे पचवून घेवू अशी नागडी ख्याती
गोर गरीब अन् दिनदुबळ्यांचे प्राण घेतलं हाती...।।१।
जिंकावं वा कसं ही घुसावं हेच आम्हाला ठावं
खुडुन लुटावं, लुटून सुटावं हेच आम्हाला ठावं
सत्तेसाठी घेवु आम्ही झाडु सुद्धा हाती...
शेतकरी, कष्टकऱ्यांचे, पेट्रोल डिझेलच्या महागाईने प्राण घेतलं हाती ॥ २ ॥
किंवा 'राधा ही बावरी ' च्या चालीवर -
बाधा ही खुर्चीची आगळी
अंगात भिनतो माज मस्त
पाहण्या कहर फुरफुरतो
विसरून भान , ओढून कान
हा वाट गावाची लावतो
या रंगीत रंगीत झेंड्यामधूनी
वाद लावुनी होई
'बाधा' ही आगळी खुर्चीची बाधा हा आगळी।।धृ.।।
अशा एकाहून एक सरस रचना वाचून हसण्यासाठी ' प्रसन्न प्रहार ' विकत घेऊन वाचणे गरजेचे आहे .
- डॉ. संजय बोरुडे,9405000280
***************************
पुस्तकासाठी संपर्क : किंमत : १३५ रु .
१.अभिजित गिरी
अभिसंधान प्रकाशन, गुरुप्रसाद नगर, रो-हाऊस क्रं. २४, फेज ३, बीड बायपास, औरंगाबाद मो. ९११२२७४०८०
२ . माधुरी साळेगावकर मो. ९४२२२९५३०४.
***********************
साळेगावकरांची विडंबने अनुभवायासाठी लिंक्स :
1 .https://youtu.be/nzxt1eO_sio
2 . https://youtu.be/-Xf7_6qMddg
3. https://youtu.be/0BSg-Wlw9zU
4. https://youtu.be/7zgu5D18zOc





अत्यंत आटोपशीर आणि सुंदर भाष्य. व्वा,क्या बात👌💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद. कृपया,फॉलो करा
हटवाखूप छान परिचय!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद. कृपया,फॉलो करा
हटवाखुपचं छान ओघवत्या शैलीत लेखन
उत्तर द्याहटवाधन्यवाद. कृपया,फॉलो करा
हटवामोजके ,महत्त्वाचे
उत्तर द्याहटवाखूप छान पुस्तक व कवी परिचय करून दिला आहे बोरुडे सर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामाजलगावचे प्रतिभावंत कवी श्री साळेगावकर सर यांच्या 'प्रसन्न प्रहार' ने विडंबन या प्रकारास एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे- सार्थ अभिमान!
उत्तर द्याहटवा