एक हृदयस्पर्शी खंडकाव्य : नवा मोहर गळतो
नवा मोहर गळतो : एक हृदयस्पर्शी खंडकाव्य
( प्रस्तुत खंडकाव्याला लिहिलेली ही प्रस्तावना असून खंडकाव्याच्या इतिहासाची माहिती व्हावी म्हणून ती इथे लेख स्वरूपात देत आहोत - संपादक )
खंडकाव्याची व्याख्या संस्कृतच्या 'साहित्य दर्पण' मध्ये आढळते. भाषा किंवा उपभाषा यामध्ये सर्गबद्ध किंवा एका कथेचे निरुपण करणारे काव्य म्हणजे खंडकाव्य होय. महाकाव्याचा तो एक अंश म्हणता येईल.
खंडकाव्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतीलः
१. खंडकाव्यत ही अखंड कथा आहे.
२. कथेचा विन्यास , आरंभ, विकास, उत्कर्षबिंदू आणि प्रयोजन याप्रमाणे असतो.
३. ते आकाराने दीर्घ नसते.
४. त्यामध्ये आठ पेक्षा कमी सर्ग असावेत.
मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दीर्घ कवितेची टूम निघाली होती. लांब पल्ल्याची कविता लिहिणे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. त्यातच एका दीर्घ कवितेला पाच आकडी पुरस्कार मिळाल्याने हे लोण जास्तच फोफावले गेले. मात्र लवकरच हे आर्थिक प्रयोजन नष्ट झाल्याने ती टूम संपुष्टात आली, असो.
ही सर्व चर्चा करण्याचे कारण म्हणजे बबन धुमाळ यांचे 'नवा मोहर गळतो' हे खंडकाव्य. खरंतर, ओवी छंदातील हे आख्यान म्हणता येईल. पण त्याची रचना खंडकाव्यासारखी केली असून त्याचे चार खंड अर्थात सर्ग तयार केले आहेत. तसेच त्यात खंडकाव्याची वैशिष्टये आढळतात. त्यामुळे या आख्यानाला खंडकाव्य म्हणून ग्राह्य धरता येणे शक्य आहे.
९९ वर्षांपूर्वी गिरीश यांचे 'अभागी कमल' (१९२३) हे काव्य पुस्तकरूपात प्रकाशित होताना त्याचा उल्लेख एक सामाजिक खंडकाव्य असा करण्यात आला आणि तेव्हापासून स्वरूपतः त्यासारखी लिहिली गेलेली काव्ये 'खंडकाव्य' या संज्ञेने ओळखली जाऊ लागली. गिरीशांचेच 'आंबराई' (१९२८) आणि 'यशवंतांचे बंदीशाळा' (१९३२) ही पुढील काव्ये या स्वरूपाची आहेत. खंडकाव्याची ही स्थूल कल्पना रूढ झाल्यावर त्या कल्पनेचा चोहोबाजूंनी विस्तार झाला. सामाजिक कथांबरोबर ऐतिहासिक, पौराणिक आणि कल्पनारम्य कथांचाही या विषयात अंतर्भाव झाला, असे निरीक्षण ह. कि. तोडमल यांनी 'अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये' या ग्रंथात मांडले आहे. पुढे अनेक खंडात्मक कथेबरोबर एकखंडात्मक सलग अशी दीर्घ कथारचनाही त्या कल्पनेत बसू लागली. पूर्वीच्या सर्गाच्या मानाने बऱ्याच तोकड्या, पण संख्येने पुष्कळच अधिक अशा खंडांचे कथाकाव्यही खंडकाव्य म्हणून मान्यता पावू लागले आणि कथा अशी म्हणण्यासारखी नसतानाही एक वा दोन-चार खंडांचे चिंतनपर काव्यही खंडकाव्य म्हटले जाऊ लागले. या पद्धतीने खंडकाव्याचा विकास झालेला दिसतो. गो. वा. कानिटकर ह्यांचे 'अकबर बादशाहा' (१८७९), ग. स. लेले यांचे 'कृष्णाकुमारी' (१८८८) अथवा वि.गो. साठ्ये यांचे 'श्री संजीवनी हरण' (१९४८) यांसारखी काव्येही त्याच नावाने ओळखण्यात येतात.
रचना आणि पद्धती या दोन्ही दृष्टींनी संस्कृत विदग्ध महाकाव्यांसारख्या हेतूतः रचल्या गेलेल्या साधुदासांच्या 'रणविहार' (१९१६), 'गृहविहार' (१९२८) यांसारख्या 'बिहार' काव्यांसही खंडकाव्यांतच ओढण्यात आले. अगदी इंग्रजी महाकाव्याच्या कल्पनेप्रमाणे लिहावयास घेतलेले 'राजा शिवाजी' (१८६९) हे कुंटे यांचे काव्यही 'महाकाव्य' या संज्ञेस पात्र न ठरल्याने अखेरीस खंडकाव्यातच जमा करण्यात आले. खंडांची संख्या आणि त्यांची किमान लांबी यांवर काही मर्यादा घालता येत नसल्याने माधव जूलियनांचे 'विरहतरंग' (१९२६),पाठकांचे 'शशिमोहन' (१९२९) यांसारखी कथाकाव्येही खंडकाव्ये ठरली, एवढेच नव्हे तर प्रकृतिदृष्ट्या अगदी वेगळे असूनही बावीस स्फुट अशा भावगीतांचे यशवंतांचे 'जयमंगला' (१९३१) हे काव्यही त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.
महाकाव्याचा एक खंड या कल्पनेस न उतरणाऱ्या चंद्रशेखरांच्या 'काय हो चमत्कार!' (१९११) अथवा विनायकांच्या 'मोहानंतर' (१९०५) यांसारख्या दीर्घ कथाकवितांचाही समावेश कथात्वांच्या जोरावर खंडकाव्यात होऊ शकतो, असे काहींना वाटले. अगदी किरकोळ कथाकविताही 'आहूतेषु विहंगमेषु मशको नायान् पुरो वार्यते' या न्यायाने खंडकाव्य समजण्याची पाळी आली. उलट कथा अशी फारशी नसलेले, किंबहुना मुळीच नसलेले, कवी अनिलांचे 'भग्नमूर्ति' (१९४०) किंवा 'मृगावर्त' (१९७१) यांना 'खंडकाव्यत्व' नाकारणे त्यांच्या गुणांमुळे अशक्य ठरले. सारांश, यासंबंधीच्या उदार धोरणामुळे जे भावगीत नसेल आणि ज्यात कथेचा अल्पही अंश असेल, त्यास खंडकाव्य म्हणावे अशीच जवळजवळ परिस्थिती आहे, असे मत तोडमल यांनी नोंदवले आहे.
खंडकाव्य रसाळ असेल तर ते वाचनीय ठरते. धुमाळ यांनी "ओवी' या लोकछंदात संपूर्ण रचना केली आहे आणि हा लोकछंद जनमाणसात खोलवर रुजला असल्याने हे खंडकाव्य निश्चितच रसाळ झाले आहे. 'नवा मोहर गळतो भाग-१' मध्ये त्यांनी बालपणीचा भोगवटा चित्रित केला आहे.
'आयुष्याची काय सांगू लय झाली परवड
हौसमौज करायला नाही मिळाली सवड '
अशा शब्दात त्यांनी आरंभ केला असून कथन विकासक्रमात हा आरंभ महत्त्वाचा आहे. ज्या वयात पाटी, पुस्तके घेऊन अक्षरे गिरवायची त्या वयात खंडकाव्याच्या नायकाला वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायला लागत किंवा डोक्यावरून मणामणाच्या मोळ्या वाहून आणावे लागत.. पाटीपुस्तकेही घेण्याची ऐपत नसल्याने ही परवड पुढील शब्दात व्यक्त झाली आहे-
'नसे पाटी पुस्तक खूप मार सोसायचो
शाळेतून घरी जाता नवे जन्मून जायचो'
'नवे जन्मून जायचो' ही प्रतिमा उत्कट आहे. खरं तर ही प्रतिमा सर्जनाचा निर्देश करणारी असावी परंतु इथे ही प्रतिमा कारुण्याचे दर्शन घडवते. कारण घरच्या बेताच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुस्तकी शिक्षणाच्या दुनियेतून व्यावहारिक दुनियेत प्रवेश करण्याचे अवस्थांतर यातील कवितिक विधानाला ती उंची प्राप्त करून देते. अशा अनेक प्रतिमा ठायीठायी आढळतात -
'जेव्हा खायलाच नसे तेव्हा एकादशी वाटे
पाणी पिताना घोटाला भाकरीचा वास सुटे'
भुकेचे हे कारूण्यसूक्त 'नवा मोहर गळतो भाग १ 'मध्ये पानोपानी दिसते. या दृष्टीने २, ३, ८, ९ आणि १३ या रचना पाहता येतील. या खंडामध्ये लहान भाऊ, माय, बाप, बहीण अशी कुटुंबातील शब्दचित्रे आलेली आहेत त्याचबरोबर गरिबी, स्वप्न आणि आस्था प्रकट झाली आहे.अर्थात हा नॉस्टॅल्जिक भाग असून त्याचे एक प्रकारचा रोमँटिसिझमही आहे. गरिबीत असतानाही कुटुंबाने पाळलेली नैतिकता आणि गरिबीच्या दिवसांचे रम्य चित्रण येते. चुलत्याच्या शब्दचित्रातून भाऊबंदकीची धग जाणवते. यादृष्टीने पुढील ओव्या पाहा
अ) वडील :
१. माझा बाप करायाचा रोज देवाशी भांडण तरी हसायाची त्याची अंगी फाटकी पैरण (गरिबीतले नैतिक सुख)
२. धसकट उपसता लागे रगताची धार तोंड दाबून बुक्यांचा आसा रोजचाच मार (गरीबांचे दु:ख)
3. पण मृग रोहिणीची वाफ जायची कोराडी लाहिये सपनाची नीघे विणा वाट्स तिरडी (स्वप्नांचा मृत्यू)
ब) चुलता-
१. माझ्या चुलत्याचं तुम्हा काय सांगू कवतिक
एक त्याची दिसापाठी एक एक आगळीक
२. बाप धीरानंच घेतो त्याच्या कलाने वागतो
तरी काळ्या रानाकडं टवकारून पाहतो (बापाचं सोसणं)
क) बहीण-
१. माझी लाडकी बहीण डुलासाठी रडायची
डुलाऐवजी गालावं पाची बोटं फुलायची
(बहिणीचे लाड कौतुक न झाल्याची भावना)
२. तिच्या डोळ्यांतून एक एक मोती गळायाचा
माझ्या मनातील देव देवळात दडायाचा (विवशता)
३. पण नशिबासारखा माझा खिसाही फाटका
नसताना मी श्रीकृष्ण कसा उभारू द्वारका?
(अगतिकता आणि रूपकता)
ड) भाऊ-
माझा लहानगा भाऊ दुधासाठी रडायाचा
तेव्हा शेजारचा राव खदाखदा हसायाचा
(शेजाऱ्यांचा दुस्वास आणि घरचे दैन्य)
इ ) आई
आई कुशीत घेऊन नवा जोम भरायची
जीवनात भोगलेले भोग ओठी आणायची
(प्रेरणा देणारी कष्टाळू आई )
ई) मावळण-
माहेरातली पोरगी सदा ठरते परकी
सासरात नांदणारी पोर ठरते लाडकी
(परंपरेचे उदात्तीकरण )
फ) घर-
'खाण्यापिण्याची आबाळ दैव गरिबीला हसे
गरिबीत वाढताना खोप स्वर्गावानी भासे' (रोमँटिसिझम)
दुसऱ्या खंडांमध्ये नायकाचे माध्यमिक शिक्षण आणि त्या वयातील त्याच्या अनुभूती प्रकट झाल्या आहेत. शांता शेळके, पाडगावकर यांच्या कविता भावल्या आणि त्या ज्ञान प्रकाशात पावलांना गती दिली. रोज नव्या वाटा पायाखाली घातल्या. हे शिक्षण घेताना किशोर वयामध्ये एक राधा आयुष्यात आली. त्या दिवसांचा उल्लेख करताना कवी धुमाळ म्हणतात -
'तिच्या पुस्तकात असे मऊ मऊ मोरपीस
मोर नाचताना मला तिच्या डोळ्यांमध्ये दिसं'
बहिणीचे लग्न झाले परंतु त्यात आलेल्या अडचणींचा पाढा, हुंडा, मानपानामुळे कुटुंबाची होणारी हेळसांड या सर्गात येते. दहावीच्या वर्गात पहिला आल्याने आई-वडिलांना झालेला आनंद आणि पडलेले गोड स्वप्न कवी मांडताना दिसतो-
'माझ्या सपनात मला घोड्यावर बसवलं
गावपाटलानं साऱ्या गावातून मिरवलं'
याच सर्गामध्ये शाळकरी वयातील प्रेम आणि प्रीतीच्या सहवासाचे ण चित्रित केले आहेत -
'राधा रानात जातानी माझ्या दाराहून जाई
तिच्या दूरच्या रानात मला पालवून नेई'
हुंडा नावाच्या प्रथेने बहिणीच्या सासऱ्यांनी तिचा जीव घेतल्याचा भाग हृद्य झाला असून कवी लेखकांना तसेच ओव्या गाणाऱ्या आयाबायांना
हुंड्याच्या विरोधात कवने करण्याचं आवाहन धुमाळ करतात-
१. जीवलग बहिणीची कशी झाली जाळणूक
आयाबायांनो ओवीत तिची मांडा छळणूक
२. लेखणीच्या सेवकांनो, लिहा हुंडा प्रथेवर
हाच ऐरणीचा प्रश्न मांडा व्यासपीठावर
यानंतरच्या सर्गात महाविद्यालयीन जीवनाचे अनुभव येतात
'कॉलेजात गेल्यावर कळू आली दोन टोकं
पैसा नसण्याचा घोक कुणा असण्याचा घोक'
दरम्यान प्रेयसीचे लग्न ठरल्याची चिठ्ठी ती नायकाच्या भाकरीच्या डब्यात टाकते. शहरात शिकणाऱ्या मुलांना गावाकडून डबा येत असतो. त्या डब्याची ते किती आतुरतेने वाट पाहत असतात याची कल्पना शहरात खोली भाड्याने घेऊन शिकलेल्या व्यक्तींना आहे. शिताफीने राधा प्रियकरापर्यंत निरोप धाडते. त्या काळात मोबाइल नसल्याने संपर्कासाठी जी यातायात करावी लागे ती यातून दिसते.
'चिठ्ठी मिळताच माझी ये रे धावून गावाला
लाव पैलतीरी माझ्या बुडणाऱ्या या नावेला'
यातून ग्रामीण तरुणीची विवशता, पुरुषप्रधान सत्तेची आणि सामाजिक संकेतांची आच जाणवते. पण परिस्थितीची कल्पना असणारा नायक गावाकडे जाऊन तिला समजावतो-
'भूक पेटता पोटात पाणी पिऊन जगावं
कसं भिकाऱ्यांना स्वप्न ऐरावताचं बघावं ?'
तिचं लग्न झाल्यावर गाव-शिवार सारा उदास झालेला. शहरात शिक्षण घेताना या दुःखावर खपली पडते. काही दिवसांनी गावी येताच आईकडून भावाची पोरगी करावी म्हणून दबाव आणला जातो. प्रसंगी ती अबोला घरते. बापाने जेवणाचे ताट धुडकावणे यासारखे प्रकार घडतात. तरीही मनाचा निर्धार पक्का ठेवून नायक शिक्षणाचा ध्यास धरतो असा सगळा कथाभाग तिसऱ्या सर्गात आलेला आहे.
'नवा मोहर गळतो भाग-४' मध्ये गावाचे बदललेले रुप चित्रित केलेले आहे. हा बदल टिपताना जागतिकीकरणाच्या फायद्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. भाबडेपणा आणि ‘जुने ते सोने' असा रोमँटिसिझम यातून दिसतो.
'किर्तनात दंगणारे कसे बसले घरात
देवळात ठेवणारी कशी विझली गा वात'
या सर्गात आलेली आशयसूत्रे पुढीलप्रमाणे
१. राजकारण आणि नासलेले गावपण
कोण ओढीतो कुणाला कोण गाडीतो कुणाला
प्रत्येकाचे घर दिसे मला बांधले उन्हाला
२. स्वाभिमान गहाण ठेवलेले आणि छंदीफंदी गावकरी -
असे बिघडले जन यांना कोण आहे वाली
हाकणारे दिसतात मला मूळचे मवाली
३. संस्थेत नोकरी लागण्यासाठी पाय धरावे लागणे -
ज्याला घ्यावंसं वाटलं त्यानं मागितलं दान
बहिऱ्याच्या पुढं कोण सांगा गातं हो गाणं ?
४. बापाने भणाणलेल्या मनाला आधार देऊन शेतीत राबविण्याचा दिलेला सल्ला -
नको फिरू भण्याभण्या पाय जमिनीव आण
वाट पाहत कितींदी तुझी नांगरलं रान
५. अंधारलेल्या मनाला आधार देण्यासाठी पुन्हा लग्न झालेल्या प्रेयसीचे येणे -
तुझी आठव सपनं तुझा आठव तो काळ
आभाळाला पेलण्याचे होते बाहुमदी बळ
६.जमीन सप्पय करून बागायती बनण्यासाठी कर्ज काढण्याचे मनसुबे व बँकेच्या नकारघंटा -
किती विनवणी केली किती घरले मी पाय
मन जणू पाषाणाचे नाही द्रवले हृदय
७. लाचखोर व्यवस्था -
असं प्रत्येक ऑफिस भ्रष्ट नागानं वेढलं भूमिवंताच्या पोरांना आहे वेडयात काढलं
८. बोअरला पाणी लागणे आणि परिस्थितीत पडलेला फरक -
तेव्हा कितीक जणांच्या माती पडली डोळ्यात
पेढा पाणी लागल्याचा त्यांच्या घातला तोंडात
९. कष्ट करून घेतलेले पीक आणि दलाल -
का न दलालांची घरं उंच आकाशी भिडावी
शेतकऱ्यांची झोपडी का न मातीला मिळावी..
१०. प्रेयसीने सांभाळलेल्या मुलीचे नायकाशी लग्न लावून देणे -
अशी राधा भेट माझी मला खूपच जपते
मला सावली देऊन स्वतः उन्हात तपते
११. बापाचे जाणे -
बाप गेल्याचं कळता उभी कोसळली आई
तिचा पाहून आक्रोश मनी ओलावली भुई
१२. आईचे घराला आधार देणे व उभे करणे -
आई थकली तरीही घरी थांबतच नाही दिस दिस रानामंदी हात चालवत राही
१३. वावर व शिवाराप्रति कृतज्ञता -
माझं वावर शिवार हेच माझे भाग्यलेख देणं घेणं सवाईचं असा व्यवहार नेक
अशा रितीने 'नवा मोहर गळतो भाग ४' हा खंड शेवटाकडे जातो. शेवटी शेतीवाडी, घरदार, प्रपंच आणि नोकरी या सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरलेला नायक येतो. आपल्या जडणघडणीचे श्रेय तथा जीवनातील कमाई याचा ताळेबंद तो मांडतो -
आज माझे मला दुःख जवाएवढे वाटते
दुःख पाहून जगाचे माझे काळीज कापते
(परोपकाराची भावना )
किंवा
आता जिकडेतिकडे स्वाती नक्षत्री आबादी
वैभवात चालवितो आईबापाची मी गादी
(संस्कार आणि वर्तमानातील समृद्धी)
अशाप्रकारे बबन धुमाळ यांनी 'ओवी' या छंदाचे केलेले पुनरुज्जीवन आणि प्रत्येक पानावर आठ चरण घेऊन एक लक्षणीय प्रयोग सिद्ध केला आहे.
नाविन्यपूर्ण प्रतिमांचे योजन, अनुप्रास व यमक यांचे तोरण, भावनिक प्रसंगांचे यथोचित वर्णन, शेतकरी जीवनात येणारे ऊन-सावलीचे क्षण आणि कष्टाची गाथा, मातापित्यांच्या संस्कारातून परोपकाराचा घेतलेला वसा अशा पद्धतीने संपूर्ण 'नवा मोहर गळतो ' चित्रित झालेला आहे.
उत्तर आधुनिक कालखंडामध्ये परंपरेचे उदात्तीकरण, जुन्या रचनाबंधाचा वापर आणि भावकाव्यातील उत्कटता खंडकाव्याच्या रूपाने मांडण्याचा धुमाळ यांचा प्रयोग निश्चितच दखलपात्र आणि हृदयस्पर्शी झाला आहे हे नोंदवतो.
- डॉ.संजय बोरुडे,अहमदनगर,
९ ४ ० ५ ० ० ० २ ८ ०


अतिशय सुंदर खंडकाव्य सर
उत्तर द्याहटवाखंड काव्याचा वास्तूपाठ देणारी अप्रतिम प्रस्तावना सरजी, आपले तथा मित्रवर्य श्री बबन धुमाळजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
उत्तर द्याहटवा